भोंदू ज्योतिषी अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; “मी अवतारी पुरुष, तू मागील जन्मातील अप्सरा” म्हणत महिलेचे शोषण 😱⚖️

KHOZ MASTER
2 Min Read

स्वतःला ज्योतिषी, भविष्यवेत्ता आणि अंकशास्त्रज्ञ सांगणाऱ्या अशोक खरात याच्या घृणास्पद कृत्यांचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. महिलांना भविष्य सांगण्याच्या नावाखाली फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात आता तिसरा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

“मी अवतारी पुरुष, तू अप्सरा” म्हणत फसवणूक

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या संसारात वाद सुरू असल्याने ती मार्गदर्शनासाठी खरातच्या कार्यालयात गेली होती. त्यावेळी तिच्या अडचणींचा फायदा घेत खरातने तिला जाळ्यात ओढले.

“मी अवतारी पुरुष आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहेस, मला त्रिकाळ ज्ञान आहे,” असे सांगत त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. भविष्याबाबत भीती दाखवत आणि आश्वासने देत त्याने तिच्याशी जवळीक वाढवली आणि तिचे लैंगिक शोषण केले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष, महिला राहिली गर्भवती

या संबंधांमुळे पीडित महिला गर्भवती झाली. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून खरातने तिला आपल्या कार्यालयात बोलावून गर्भपातासाठी औषधे दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

“तू माझ्याशी लग्न कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना सांभाळेन,” असे आश्वासन देत 2027 मध्ये लग्न करू असे सांगून तो तिला सतत फसवत राहिला, असेही तक्रारीत नमूद आहे.

एसआयटीकडून चौकशी सुरू

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू आहे. या तपासात मालमत्ता, आर्थिक व्यवहार, जमीन खरेदी आणि महिलांशी संबंधित आरोपांबाबत खरातला सखोल प्रश्न विचारले जात आहेत. या तपासात एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते उपस्थित होत्या.

माहितीनुसार, चौकशीदरम्यान सलग अनेक तास प्रश्नोत्तर झाल्यानंतर खरात पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून आले. त्याला व्यवस्थित चालताही येत नसल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यभर संतापाचे वातावरण

या प्रकरणातील धक्कादायक खुलास्यांमुळे राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना फसवून शोषण करणाऱ्या अशा भोंदू बाबांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 🔥

0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *