उपोषणाच्या पाचव्या दिवशी ‘भिवा’ जिंकला

KHOZ MASTER
2 Min Read

खापरखेडा

परिसरातील भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीमुळे प्रभावित गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सामाजिक कार्यकर्ता भिवा तांडेकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणानंतर प्रशासन हलले असून पुनर्वसनासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाचव्या दिवशी प्रशासन हलले

भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीमुळे अनेक गावकरी प्रभावित झाले असून गेल्या ११ वर्षांपासून त्यांचे पुनर्वसन रखडले होते. या पार्श्वभूमीवर भिवा तांडेकर यांनी १८ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले. रविवारी (२२ मार्च) उपोषणाचा पाचवा दिवस उजाडताच त्यांची प्रकृती ढासळल्याने प्रशासनात खळबळ उडाली.

यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि श्यामकुमार बर्वे यांच्या मध्यस्थीने चर्चा झाली आणि उपोषण सोडवण्यात आले.

पुनर्वसनासाठी ९ कोटी रुपये जमा

बैठकीत वेकोलि प्रशासनाने पुनर्वसन प्रक्रियेसाठी ९ कोटी रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले. हर्षद दातार यांनी २५ मार्चपूर्वी ही रक्कम सावनेर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करण्याचे लेखी मान्य केले.

यावेळी डॉ. विपीन इटनकर यांनी वादग्रस्त जमिनीचा मोबदला सीबीआय न्यायालयात जमा केला जाईल, असे स्पष्ट केले.

३१० घरे प्रभावित

भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीमुळे जुन्या भानेगाव परिसरातील सुमारे ३१० घरे प्रभावित झाली आहेत. या गावाचे पुनर्वसन भानेगाव ग्रामपंचायत हद्दीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जागेची पाहणीही करण्यात आली आहे. पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

अनेक अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित

या बैठकीला संपत खलाटे, गणेश जगदाळे, हरीश रूमकर, सरपंच नारायण भडंग, उपसरपंच हरीश गजभिये तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

११ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर आता प्रशासनाने पावले उचलल्याने गावकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 9 4 6 8 6
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *