नागपूर / हिंगणा येथे शिक्षण, आरोग्य आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत मोठा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे व्यक्तिमत्त्व विदर्भात आदराने घेतले जाते. १९३६ साली जन्मलेल्या दत्ता मेघे यांनी वर्धा परिसरातून आपली सार्वजनिक कारकीर्द सुरू केली आणि पुढे हिंगणा तालुक्याला आपली कर्मभूमी बनवत जनतेशी घट्ट नाते निर्माण केले.
शिक्षणक्षेत्रातील मोठे योगदान
दत्ता मेघे यांनी शिक्षण हेच समाजउभारणीचे प्रभावी साधन मानत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दालने खुली केली. १९८४ साली वानाडोंगरी येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर हिंगणा परिसरात महात्मा गांधी हायस्कूल सुरू करून दर्जेदार प्राथमिक शिक्षणाची सोय केली.
त्यांच्या संस्थांमधून केवळ शिक्षणच नाही तर स्थानिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या. गरजू विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मदत करणे आणि त्यांची अडचण सोडवण्यासाठी तत्पर राहणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. त्यामुळेच त्यांच्या कार्यालयात नेहमीच नागरिकांची गर्दी असायची.
राजकारणातील प्रभावी प्रवास
दत्ता मेघे यांनी राजकारणातही उल्लेखनीय कामगिरी केली. १९९१ मध्ये ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९६ मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.
काँग्रेसमध्ये कार्य केल्यानंतर त्यांनी पुढे भारतीय जनता पक्षात प्रवेश करून वरिष्ठ नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली. राजकीय क्षेत्रात त्यांनी संयम, दूरदृष्टी आणि जनसंपर्काच्या बळावर मोठा प्रभाव निर्माण केला.
पुत्राच्या विजयासाठी घेतला पुढाकार
२०१४ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवे वळण मिळाले. त्यांच्या पुत्राला समीर मेघे भाजपाकडून हिंगणा विधानसभेची उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत दत्ता मेघे यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली. वयाची पंचाहत्तरी ओलांडूनही त्यांनी ५० हून अधिक प्रचारसभा घेत कार्यकर्त्यांना एकत्र आणले. त्यांच्या प्रयत्नांमुळे समीर मेघे यांना तब्बल २३ हजार मताधिक्यांनी विजय मिळाला.
आरोग्य क्षेत्रातही मोठे कार्य
शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. वानाडोंगरी येथे शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सुरू करून त्यांनी आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. विशेषतः कोरोना काळात या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि अनेकांचे प्राण वाचले.
अनाथांसाठी उभारले बालसदन
सामाजिक कार्यातही दत्ता मेघे पुढे होते. हिंगणा एमआयडीसी परिसरातील नीलडोह येथे त्यांनी अनाथ मुलांसाठी ‘नेहरू बालसदन’ची स्थापना केली. येथे अनेक अनाथ मुलांना शिक्षण व निवारा उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे अनेक जण त्यांना प्रेमाने “अनाथांचे नाथ” म्हणत.
समाजमन जिंकणारे व्यक्तिमत्त्व
वयाची ८५ वर्षे ओलांडल्यानंतरही ते सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांत सक्रिय राहिले. शिक्षण, आरोग्य आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.
दत्ता मेघे हे विदर्भाच्या मातीतील असे नेते होते ज्यांनी समाजसेवा, शिक्षणाचा प्रसार आणि जनतेशी असलेले नाते या तिन्ही गोष्टींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याचा ठसा विदर्भाच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर कायम राहणार आहे.
Users Today : 43