देऊळगाव राजा
तालुक्यातील सुरा येथे जुन्या वादातून एका ७० वर्षीय वृद्धाला अडवून बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरा येथील रहिवासी भास्कर एकनाथ चेके (वय ७०) हे १९ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता आपल्या मोटारसायकलने गावातून जात होते. यावेळी आरोपी प्रकाश सुरेश चेके (रा. सुरा) याने त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना अश्लील शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपीने वेळूच्या काठीने भास्कर चेके यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात त्यांना गंभीर मार लागला असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी भास्कर चेके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश सुरेश चेके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६ (२), ११८ (१), २९६ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती कायंदे करीत आहेत.
Users Today : 25