मलकापूर
देवधाबा येथे प्लॉटची सिमेंटची खुण कोणी तोडली या किरकोळ कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, ज्ञानेश्वर जाणू कवळे (वय २८, रा. देवधाबा) आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी असून एकाच समाजाचे आहेत. २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता ज्ञानेश्वर कवळे हे आपल्या प्लॉटची सिमेंटची खुण कोणी तोडली, याची विचारणा करण्यासाठी शेजारी राहणारे पुरुषोत्तम निनाजी सपकाळ यांच्याकडे गेले होते.
या प्रश्नावरून दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची सुरू झाली. वाद वाढत गेल्याने आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून फिर्यादीला पकडून ठेवले. यावेळी आरोपी पुरुषोत्तम निनाजी सपकाळ यांनी बांबूच्या काठीने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपीची पत्नी सरला सपकाळ हिने फिर्यादीच्या गालावर चापटी मारून अपमानित केले.
यावेळी सर्व आरोपींनी मिळून अश्लील शिवीगाळ करत “पुन्हा विचारायला आला तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर त्यांचे चुलत भाऊ गणेश संतोष कवळे आणि पुतण्या विजय गजानन कवळे हे मदतीला धावून आले. त्यांनी मध्यस्थी करून वाद सोडवला आणि जखमी फिर्यादीला उपचारासाठी हलवले.
या प्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर जाणू कवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पुरुषोत्तम निनाजी सपकाळ, ज्ञानेश्वर पुरुषोत्तम सपकाळ, अनंता पुरुषोत्तम सपकाळ आणि सरला सपकाळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१ (२)(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास प्रशांत राठोड, पोलीस उपनिरीक्षक, करीत आहेत
Users Today : 54