संग्रामपूर
प्रतापराव जाधव यांनी तालुक्यातील दौऱ्यादरम्यान जस्तगाव येथे जाऊन शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांच्या निघृण खून प्रकरणी त्यांच्या माहेरच्या डोसे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शिक्षिका असलेल्या वृषाली गावंडे यांच्या खून प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांनी कुटुंबीयांकडून जाणून घेतली. या घटनेत कटकारस्थान रचून निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप माहेरच्या डोसे कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन प्रतापराव जाधव यांनी सखोल चौकशीची मागणी व्यक्त केली. यावेळी कुटुंबीयांकडून त्यांना निवेदन देण्यात आले. पीडित कुटुंबाने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच प्रकरणाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अल्पावधीतच चार आरोपींना अटक केली असून तपासादरम्यान आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. मृत शिक्षिकेचे भाऊ सुमित नागोराव डोसे यांनी संशय व्यक्त करून तपासाला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच या प्रकरणातील सुपारी किलर गेल्या दहा वर्षांपासून शेगाव येथे वास्तव्यास असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोलिस यंत्रणेला सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
यावेळी मयत शिक्षिका वृषाली यांचे वडील नागोराव डोसे, आई छाया डोसे, भाऊ सुमित डोसे, वहिनी विद्या सुमित डोसे तसेच गावातील विविध समाजातील शोकाकुल नागरिक उपस्थित होते. याशिवाय चेतन घिवे पाटील, केशव ढोकने यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 25