चिखली
चिखली येथे २१ मार्च रोजी सकल हिंदू समाज आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम आणि हिंदू संस्कृतीबद्दल सातत्याने अपमानजनक विधाने करून समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करत या संदर्भात कारवाईची मागणी करण्यात आली. हे निवेदन चिखलीचे नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी स्वीकारले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आमदार आव्हाड हे जाणीवपूर्वक इतिहासाचा विपर्यास करत असून राज्याभिषेकासारख्या पवित्र प्रसंगाबाबत जातीय तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत. लोकशाहीचा गैरवापर करून विधीमंडळाच्या पदाची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच केवळ ‘दिलगिरी’ व्यक्त करून वेळ मारून नेण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी राज्यात तातडीने ‘ईशनिंदा विरोधी कायदा’ लागू करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. वारंवार होणाऱ्या अशा अपमानास्पद प्रकारांमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी अमोल वानखेडे, प्रसाद येवले, गणेश चव्हाण, ओमराजे गायकवाड, राहुल मोरे, सुजित कोरे, अनिकेत पेंढारकर, हरिभाऊ सोळंके, आकाश सांगळे, चेतन गुप्ता, संदीप ठेंग, योगेश भगत, विजय लाहोरकर, दीपक गाडेकर, तुषार भुतेकर, विशाल भुतेकर, प्रताप कंडारे, ऋषीकेश करवंदे, राकेश गोंधणे, सुनील जाधव यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 25