चिखली : दैनिक देशोन्नतीचे संपादक तथा व-हाडची धडधडती तोफ म्हणून आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि पराकोटीच्या सकारात्मक विचारांसाठी तसेच निर्भीड तथा आक्रमक वक्तृत्वशैलीमुळे आणि सोबतच कुठल्याही सामाजिक किंवा शासकीय-प्रशासकीय वैगुण्याच्या वर्मावरंच सडेतोडपणे आसूडासारखे ताशेरे ओढून सत्यवादीवृत्तीस्तव वास्तव समोर मांडण्यासाठी महाराष्ट्रंच नव्हे तर राज्याबाहेर राजधानीपर्यंत परिचित असलेले आयुष्मान राजेश राजोरे यांना सर्वश्रुत बहुजन साहित्य संघाच्या वतीने चिखली येथील महाराजा अग्रसेन रिसाॅर्ट येथे आयोजित, दि. २० नोव्हेंबर, २०२२ रोजी संपन्न होणाऱ्या – बहुजन साहित्य संमेलन – २०२२ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले असून तसे आग्रहाचे निमंत्रण – पत्र त्यांना आज दि. ५ ऑक्टोबर, २०२२ रोजी संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, सचिव शाहीर मनोहर पवार तथा सल्लागार ज्येष्ठ कवी तडका-कार प्रा. अशोक सारडा यांचे हस्ते सन्मानाने देण्यात आले. त्याचवेळी मेहकर येथील सुप्रसिद्ध पत्रकार तथा सक्षम सूत्र-संचालनासाठी प्रसिद्ध असलेले आयुष्मान सिध्देश्वर पवार यांच्या सह वाशीम जिल्ह्यातील साहित्यिक क्षेत्रातील नामवंत सूत्र-संचालक-कवी आयुष्मान चाफेश्वर कांगवे याना सुध्दा या साहित्य संमेलनात आवर्जून निमंत्रित करण्यात येऊन त्यांनाही तसे रीतसर निमंत्रण-पत्र उपरोक्त प्रसंगी देण्यात आले. वरील सर्व मान्यवर मेहकर येथे एका पुस्तक-प्रकाशन सोहळ्यासाठी आलेले असतांना संघाच्या वर उल्लेखीत पदाधिकाऱ्यांनी उपरीनिर्दिष्ट सर्व मान्यवरांना वरीलप्रमाणे ही निमंत्रण-पत्रे दिली.