अवकाळी पावसासह गारपीट; साखरखेर्डा परिसरात पिकांचे मोठे नुकसान

KHOZ MASTER
2 Min Read

साखरखेर्डा

तालुक्यातील साखरखेर्डा व शेंदुर्जन मंडळ परिसरात १ एप्रिल रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कंडारी, भंडारी आणि जागदरी परिसरात झालेल्या गारपिटीमुळे पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली.

सायंकाळी अचानक ढग दाटून येत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काढणीला आलेली पिके वाऱ्यामुळे आडवी पडल्याने शेतकरी वर्गात एकच धावपळ उडाली. सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाल्याने उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ४० हेक्टरवरील कांदा बीज, २५ हेक्टरवरील टरबूज (कलिंगड) तसेच १० हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय भाजीपाला, मका, मूग व उडीद या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर खरात यांनी नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे सादर केला आहे.

आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसामुळे दुहेरी संकट कोसळले असून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी शंकरराव उगलमुगले यांनी केली आहे.

वीजपुरवठा खंडित; नागरिकांत संताप
दरम्यान, साखरखेर्डा परिसरात सायंकाळी ६ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल सहा तास अनेक गावे अंधारात होती. वीज उपकेंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आगामी निवडणुकांत वेगळा निर्णय घेण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

0 9 5 5 7 9
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *