दुसरबीड
आधुनिकतेच्या युगातही परंपरेची मशाल तेजोमय ठेवत दुसरबीड गावात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाघे-मुरळी आणि देवीच्या सोंगांच्या पारंपरिक कार्यक्रमाने श्रद्धा, उत्साह आणि सांस्कृतिक वैभव यांचा संगम साधत ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन किनगाव राजा येथील ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मान्यवरांसह जेष्ठ सोंगाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ग्रामदैवत ‘तळ्याची आई जगदंबा देवी’प्रती असलेल्या अढळ श्रद्धेची ही परंपरा जिवंत अभिव्यक्ती ठरत आहे.
रात्री वाघे-मुरळीच्या गजरात कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर विविध सोंगांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे प्रभावी संदेश देण्यात आले. स्वच्छतेचा संदेश देणारे झाडझुडीचे सोंग, लिंबाडा, श्रीगणेश-शारदा, महादेव-पार्वती, भस्मासुर वध, हिरण्यकश्यपू वध, भक्त प्रल्हाद, सूर्यनारायण, अस्वल तसेच केवट बांधवाचे मच्छी सोंग आणि रामायणातील विविध प्रसंगांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
या सोंगांचे सादरीकरण करण्यासाठी सोंगाडी मंडळी गुढीपाडव्यापासून दररोज डफड्याच्या तालावर पावली व संवादाचा सराव करत असल्याचे दिसून आले. त्यांच्या मेहनतीची आणि निष्ठेची प्रचिती प्रत्येक सादरीकरणातून मिळाली.
जगदंबा पंचकमिटीच्या वतीने गेल्या ६८ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे जपली जात आहे. सोशल मीडियाच्या युगातही परंपरेची ही ज्योत तेवती ठेवण्यात गावकऱ्यांनी यश मिळवले आहे.
रात्री ९ ते पहाटे ४ वाजेपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमानंतर सकाळी ५ वाजता देवीच्या सोंगाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक डफड्याच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीत महिला, पुरुष आणि भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला.
या उत्सवामुळे गावात ऐक्य, उत्साह आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जगदंबा पंचकमिटीने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडला.
Users Today : 6