नागपूर
गिट्टीखदान येथील हनुमान जन्मोत्सवाच्या शोभायात्रेतून बेपत्ता झाल्यानंतर क्रूर हत्येच्या बळी पडलेल्या १४ वर्षीय अथर्व ननोरेच्या पार्थिवावर रविवारी तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अथर्वच्या घरापासून मानकापूर घाटापर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मानकापूर, अंबाझरी आणि कोराडी पोलीस ठाण्यांमधील पोलीस दलाला दंगानियंत्रणासाठी तैनात करण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर दुपारी दोन वाजता मृतदेह गिट्टीखदान येथील घरात आणण्यात आला. आपला मुलगा गमावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश उसळला आणि परिसरात तणाव निर्माण झाला.
अंत्ययात्रा सुरू असताना नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्मशानभूमीतही वरिष्ठ अधिकारी आणि दंगानियंत्रण पथक तैनात होते. सायंकाळी चार वाजता शोकाकुल वातावरणात अथर्वच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थित प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता – “या निष्पाप मुलाचा दोष तरी काय?”
अंत्ययात्रेदरम्यान, गिट्टीखदान चौकात अनेक श्रद्धांजली फलक लावण्यात आले होते. फलकांवर आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी आणि क्रूर कृत्याविरुद्ध निषेध व्यक्त करणारा मजकूर होता. सोशल मीडियावरही लोकांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
अथर्वचे वडील दिलीप ननोरे यांनी मुलाच्या अचानक मृत्यूचा जबर धक्का बसल्याचे सांगितले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “आमचे कोणाशीही वैर नव्हते, मग माझ्या मुलासोबतच असे का झाले?”
या घटनेमुळे परिसरात दुःख व संतापाची लाट पसरली असून, पोलिस तपास अद्याप सुरू असून आरोपी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
