लोणार सरोवराच्या विकासासाठी ९.८८ कोटींचा निधी मंजूर; जतन व संवर्धनाला गती*

KHOZ MASTER
2 Min Read

लोणार

जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी राज्य शासनाने ९ कोटी ८८ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रस्तावास नियोजन विभागाने मंजुरी देत हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

लोणार सरोवर विकास आराखड्यांतर्गत वर्ष २०२५-२६ साठी हा निधी वितरित करण्यात आला असून, यामुळे प्रलंबित विकासकामांना गती मिळणार आहे. अमरावती विभागीय आयुक्तांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी शासनाकडे पत्राद्वारे निधीची मागणी केली होती. त्या विनंतीचा सकारात्मक विचार करत शासनाने हा निधी तातडीने मंजूर केला आहे.

*४३४ कोटींच्या आराखड्याला आधीच मान्यता*
लोणार सरोवराच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण ४३४.६१ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय आराखड्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्यांतर्गत सरोवराचे नैसर्गिक सौंदर्य जपणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणे यावर भर देण्यात येत आहे.

यामध्ये सरोवर परिसरातील प्राचीन मंदिरांचे जतन, पर्यटकांसाठी पदपथ (पायवाटा), संरक्षक भिंती, सांडपाणी व्यवस्थापन तसेच पर्यटन केंद्रांचा विकास यांसारख्या कामांचा समावेश आहे.

*आतापर्यंत १२३ कोटींचा खर्च*
या प्रकल्पासाठी आतापर्यंत १२३.२४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. नव्याने मंजूर झालेला ९.८८ कोटींचा निधी विविध विकासकामांवर खर्च करण्यात येणार आहे.

या निधीमुळे आराखड्यातील उर्वरित कामांना वेग मिळून लोणार सरोवराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. तसेच खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याची जबाबदारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे सोपवण्यात आली आहे.

0 9 5 7 3 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *