बुलढाणा –
सद्भावना सेवा समितीच्या वतीने आयोजित संगीतमय रामकथा कार्यक्रमाला ७ एप्रिलपासून अयोध्याधाम, लहाने ले-लाऊट मैदान येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या कथेमध्ये साध्वी सृष्टीलता रामायणीजी यांनी भारतीय नारीच्या महत्त्वावर प्रभावी मार्गदर्शन केले.
रामकथेच्या प्रारंभी प्रथम पुष्प गुंफताना त्यांनी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ या उक्तीचा उल्लेख करत, ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो, तेथे देवतांचा वास असतो, असे सांगितले. नारी ही समाजाची शक्ती असून तिचा आदर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात आगमनावेळी महिला शक्तीने स्कूटर रॅली काढून साध्वीजींचे उत्साहात स्वागत केले. बुलढाणा शहरात महिलांना नेतृत्वाची संधी दिल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुकही व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माहेश्वरी समाज महिला मंडळाच्या वतीने सामूहिक आरती करण्यात आली. कथेवर आधारित प्रश्नमंजुषा अंजली परांजपे यांनी घेतली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सद्भावना सेवा समिती गेल्या पंचवीस वर्षांपासून सत्संग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याबद्दल साध्वीजींनी समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी मागील २५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेत रामकथेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी उपाध्यक्ष राजेश देशलहरा यांच्या हस्ते समितीच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण करण्यात आले. मुख्य यजमान रतनलाल निरंजन वर्मा व इतर मान्यवरांच्या हस्ते साध्वीजी व रामायण ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा अभंग सादर करण्यात आला, ज्यामुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
रामकथेच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मंडळ विशेष परिश्रम घेत असून, तुलादानासाठी भाविकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
Users Today : 5