मोताळा –
काशी विश्वनाथ दर्शनासाठी निघालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांच्या लक्झरी बसला उत्तर प्रदेशातील वाराणसी–गोरखपूर महामार्गावर गाझीपूरजवळ अपघात झाला. या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील *सरस्वतीबाई पाखरे* तसेच अकोला जिल्ह्यातील सुमारे ५० वर्षीय *अन्नपूर्णाबाई* यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर इतर भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.
ही बस ‘जय श्रीराम टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स’च्या वतीने देवदर्शन यात्रेसाठी निघाली होती. महाराष्ट्रातील भाविक अयोध्या, काशी व नेपाळमधील तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी प्रवास करत होते. ९ एप्रिल रोजी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास गाझीपूर जिल्ह्यातील नंदगज परिसरात हा अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री *प्रतापराव जाधव* यांनी तातडीने उत्तर प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी तेथील जिल्हाधिकारी *दिनेश कुमार* तसेच सीएमओ *डॉ. सुनील पांडे* यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जखमींना त्वरित व सर्वोत्तम वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना दिल्या.
तसेच त्यांच्या कार्यालयातील अधिकारी डॉ. गोपाल डिके व आचल भाटिया हे मदतकार्यासाठी गाझीपूरकडे रवाना झाले आहेत. राज्य प्रशासनाकडूनही मंत्रालय स्तरावरून या घटनेची दखल घेऊन मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, या यात्रेत एकूण ९३ भाविक सहभागी झाले होते. त्यापैकी दुसऱ्या ट्रॅव्हल्समधील ४७ भाविक सुरक्षित असून ते काशीच्या दिशेने पुढे रवाना झाले आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे बुलढाणा व अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली असून जखमी भाविकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.
