देऊळगाव राजा –
तालुक्यातील डोद्रा-इसरूळ शिवारात Leopard चा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोद्रा येथील शेतकरी शालिकराम काशीराम शिंदे यांच्या शेतात बिबट्याने हल्ला करून तीन महिन्यांच्या वासराचा बळी घेतल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना गट क्रमांक २३ मधील शेतात घडली. सकाळी शेतात गेल्यावर शिंदे यांना वासरू मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, इसरूळ परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून आतापर्यंत तीन जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शेतकरी शालिकराम शिंदे यांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाई देण्याबरोबरच बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक बनले असून जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. वनविभागाने तातडीने पावले उचलून बिबट्याला पकडावे किंवा त्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Users Today : 9