चिखली –
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय संगणक प्रोग्रामिंग स्पर्धेत चिखली तालुक्यातील वरखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत शाळेने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावत पाच लॅपटॉप आणि कॉम्प्युटर किट असे आकर्षक बक्षीस मिळवले.
या स्पर्धेत इयत्ता आठवीचे विद्यार्थी आदित्य मुंढे आणि अनुष्का अंभोरे यांनी कोडिंगवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत तयार केलेल्या या प्रकल्पाने परीक्षकांची विशेष दाद मिळवली. त्यांच्या कल्पक सादरीकरणामुळेच शाळेला जिल्हास्तरावर हे यश प्राप्त झाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी स्पर्धेदरम्यान शाळेच्या स्टॉलला भेट देत प्रकल्पाची पाहणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोडिंग आणि प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल शाळेला पाच नवीन लॅपटॉप आणि कॉम्प्युटर किट देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही संगणक शिक्षणाची अधिक चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक शरद बंगाळे, वर्गशिक्षक शुभम बुरकुल तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश भगत यांचे मार्गदर्शन लाभले.
वरखेड शाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य, पालक आणि ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ‘शिका आणि संघटित व्हा’ या विचाराला आधुनिक कोडिंगची जोड देत वरखेडच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Users Today : 15