देऊळगाव राजा
तालुक्यातील दगडवाडी येथे १० एप्रिलच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग विझवण्याच्या प्रयत्नांदरम्यान घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सात जण जखमी झाले. मात्र, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
दगडवाडी येथील कारभारी दिपाजी नागरे यांच्या घराला मध्यरात्री अचानक आग लागली. शेजारील सौंदा उगलमुगले हे बाहेर आले असता त्यांनी ही घटना पाहून तत्काळ गावकऱ्यांना सतर्क केले. सरपंचांशी संपर्क साधण्यात आला तसेच पत्रकार गजानन घुगे यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. अवघ्या १५ ते २० मिनिटांत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ग्रामस्थांनी पाण्याच्या बाटल्यांद्वारे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.
दरम्यान, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच घरातील गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे घरावरील टिन पत्रे व मोठे दगड दूरवर फेकले गेले. मोठ्या आवाजामुळे परिसरात घबराट पसरली. मदतकार्य करत असलेल्या अनेक ग्रामस्थांना दुखापत झाली. काहीजण एकमेकांवर पडले, तर काहींना उडालेल्या पत्र्यांमुळे आणि दगडांमुळे इजा झाली.
या दुर्घटनेत आर्यन घुगे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला १८ टाके पडले आहेत. इतर जखमींमध्ये सत्यभामा उगलमुगले, चंद्रभागा घुगे, गजानन घुगे, शारदा घुगे, शांताबाई घुगे आणि रंजना डोईफोडे यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाने संयुक्तरित्या कारवाई करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. परिसरात घरे जवळजवळ असल्याने आग वाढली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, वेळेवर पोहोचलेल्या अग्निशामक दलामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या आगीत घरातील धान्य, महत्त्वाची कागदपत्रे, घरगुती साहित्य तसेच छपराचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागली तेव्हा घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
या घटनेत ठाणेदार ब्रह्मगिरी, अग्निशामक दलाचे चालक मापारी तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि सौंदा उगलमुगले यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले आहे.
Users Today : 21