साखरखेर्डा परिसरात परप्रांतीय मजुराचा खून; सहकाऱ्यालाच अटक*

KHOZ MASTER
2 Min Read

 सिंदखेड राजा 

तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पिंपळगाव उंडा परिसरात २९ एप्रिलच्या रात्री परप्रांतीय मजुराचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करताना त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यानेच खून केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मृत व्यक्ती करमजीत सिंग जनक सिंग (वय ५०, रा. पंजाब) हे इतर मजुरांसह शेतात गहू, हरभरा व मका काढण्याचे हार्वेस्टिंगचे काम करत होते. ते वनिता किशोर काटकर यांच्या शेताजवळील टिनशेडमध्ये वास्तव्यास होते.

२९ एप्रिलच्या रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह खाटेवर संशयास्पद स्थितीत आढळून आला. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू असल्याचा भास निर्माण झाला होता. मात्र साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कारेवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाची दिशा बदलली.

तपासादरम्यान मृतक आणि आरोपी बबलीसिंग सुखदेव सिंग (रा. पंजाब) यांच्यात कामाच्या कारणावरून वाद झाल्याचे समोर आले. गहू व मका काढताना योग्य लक्ष दिले जात नसल्यामुळे पिकाची नासाडी होत असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले.

या वादातून आरोपीने करमजीत सिंग यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह खाटेवर ठेवून नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन कारेवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले. कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणी हरिंदर सिंग इंद्रजीत सिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साखरखेर्डा पोलीस करत आहेत.

0 9 6 8 3 5
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *