९० हजार कोटींची बिले थकीत; कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन सुरू

KHOZ MASTER
1 Min Read

सिंदखेड राजा –

शासनाकडून सुमारे ९० हजार कोटी रुपयांची बिले थकवण्यात आल्याने शासकीय कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, जिल्ह्यात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे विविध विकासकामांवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यांच्या नेतृत्वाखाली ७ एप्रिलपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे ५०० कंत्राटदार आणि सुशिक्षित अभियंते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सुमारे ५०० कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

संघटनेने यापूर्वी २६ फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांना निवेदने सादर करून थकीत देयके तत्काळ अदा करण्याची मागणी केली होती. ९ मार्च २०२६ रोजी कर्जत येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतही कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

मात्र, शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर कंत्राटदारांनी कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या आंदोलनामुळे पाणीपुरवठा योजना तसेच इतर शासकीय कामे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून थकीत बिले अदा करावीत, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कंत्राटदार संघटनेने दिला आहे.

0 9 6 1 7 0
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *