नागपूर –
जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १७ एप्रिल रोजी आदेश काढून हा बदल जाहीर केला आहे.
हवामान विभागाने १८ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून दुपारच्या वेळेत तीव्र उकाडा जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी २० एप्रिलपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आता सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत भरवण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हापासून संरक्षण मिळणार असून उष्माघाताचा धोका कमी होणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनांनी या बदलास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून गरज भासल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Users Today : 34