बुलढाणा –
केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष ना. प्रतापराव जाधव यांनी दिले.
बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ना. प्रतापराव जाधव होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीपूर्वी अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा मोहिमेंतर्गत जलकुंभ पूजन केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली.
### सिंचन प्रकल्प व पुनर्वसनाचा आढावा
सिंचन प्रकल्पांचा आढावा घेताना भूसंपादन व पुनर्वसन प्रक्रियेतील तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुनर्वसन गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. जिगाव सिंचन प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याचेही निर्देश देण्यात आले.
### पीक विमा व शेतकरी विषय
पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ मध्ये सुमारे ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ७१२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. २०२५-२६ हंगामातील प्रक्रिया सुरू असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. ई-केवायसी प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
### महत्त्वाच्या सूचना
* मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी
* शालेय पोषण आहाराची नियमित तपासणी करावी
* सीएससी व आधार केंद्रांवरील तक्रारींची चौकशी करून कारवाई करावी
### विविध योजनांचा आढावा
बैठकीत प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मनरेगा, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, डिजिटल इंडिया, पीएम श्री शाळा, कौशल्य विकास योजना, रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आदी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व योजना पारदर्शकपणे आणि गतीने राबवून नागरिकांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर भर देण्याचे आवाहन ना. प्रतापराव जाधव यांनी केले.
Users Today : 34