बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद पेटला असून, या प्रकरणात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड चर्चेत आले आहेत. कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादात आता महत्त्वाची घडामोड घडली असून, आमदार गायकवाड यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी संतापाच्या भरात अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का करण्यात आला, याबाबत त्यांनी जाब विचारल्याचेही या ऑडिओत ऐकू येत असल्याचे सांगितले जाते.
“जिभ घसरली, माफी मागतो”
वाद वाढत असताना आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मान्य केले की, बोलताना काही अपशब्द निघाले, जे अयोग्य होते.
“माझा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर राखला जावा, हीच माझी भूमिका होती. मात्र बोलताना माझी जिभ घसरली, त्याबद्दल मी माफी मागतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया
या घटनेनंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी आमदारांच्या भूमिकेचे समर्थन केले, तर अनेकांनी त्यांच्या भाषेवर टीका केली. सोशल मीडियावरही या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली.
वाद अजूनही शांत नाही
जरी आमदारांनी माफी मागितली असली, तरी या प्रकरणावरून निर्माण झालेला वाद पूर्णपणे शांत झालेला नाही. पुस्तकातील आशय, ऐतिहासिक संदर्भ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावरून पुढील काही दिवसांतही चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे.
Users Today : 28