अकोला – पीसीपीएनडीटी अर्थात गर्भधारणापूर्व वा प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यासंदर्भात अधिक जनजागृती व्हावी यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ वर तसेच www.amchimulgi.com या संकेतस्थळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी आज दिले.
पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा प्रभारी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात पार पडली. या बैठकीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन वि.द. सुलोचने आदी उपस्थित होते.
समितीच्या विधी समुपदेशक ॲड. शुभांगी ठाकरे यांनी प्रारंभी समितीने केलेल्या सोनओग्राफी तपासणीबाबत माहिती दिली. अपर जिल्हाधिकारी घुगे यांनी निर्देश दिले की, यासंदर्भात अधिक जनजागृती व्हावी यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ वर तसेच www.amchimulgi.com या संकेतस्थळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. तसेच स्वयंसेवी संस्थाचा सहभाग घ्यावा. या टोल फ्री क्रमांकावर वा वेबसाईटवर प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून कारवाई केली जाते. कारवाईत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास माहिती देणाऱ्या एक लक्ष रुपये बक्षीस दिले जाते, अशी माहितीही यावेळी ॲड. शुभांगी ठाकरे यांनी दिली.