मेहकर –
शहरातील नागसेन चौक परिसरातील जानेफळ फाटा–जानेफळ रोडवरील पावर हाऊसजवळ रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदंबा हॉटेल, तोरणा चहा सेंटर तसेच अशोकराव ठोकरे यांचे कपड्यांचे दुकान या तिन्ही दुकानांना अचानक आग लागली. आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केल्याने दुकानांतील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून राख झाले.
या आगीत फ्रीजसह इतर विद्युत उपकरणे जळाली असून कपड्यांचे दुकानातील संपूर्ण माल तसेच चहा सेंटरमधील साहित्य भस्मसात झाले. याशिवाय लगत असलेल्या कृषी केंद्रालाही काही प्रमाणात आर्थिक फटका बसल्याची माहिती मिळाली आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. नागरिकांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. नगरपालिका प्रशासन, महावितरण आणि पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगराध्यक्ष किशोर गारोळे, विलासराव चनखोरे, अमर घोडे, काँग्रेसचे नगरसेवक मुजीब कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस विभागाकडून कांचन जारवाल, बिरजे, वाहतूक पोलिस तसेच इतर कर्मचारी मदतकार्यामध्ये सहभागी झाले.
दरम्यान, या आगीत नुकसान झालेल्या दुकानदारांना नगरपालिका किंवा महसूल विभागामार्फत तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.
Users Today : 8