नवी दिल्ली : देशात एलपीजी गॅस पुरवठ्यावर तणाव निर्माण झालेल्या परिस्थितीत गॅस कंपन्यांनी ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुज खाडी बंद झाल्याने एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याच पार्श्वभूमीवर सिलेंडर वितरण प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत.
एलपीजी सिलेंडर वितरणातील गैरप्रकार आणि काळाबाजार रोखण्यासाठी आता डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. ग्राहकांच्या मोबाईलवर येणारा हा कोड सिलेंडर प्रत्यक्ष मिळाल्यानंतरच डिलिव्हरी बॉयला सांगायचा असतो. मात्र, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी याच प्रक्रियेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे.
गॅस कंपन्यांचा थेट इशारा
HP Gas, Indane आणि Bharatgas यांनी ग्राहकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनेक फसवे कॉलर स्वतःला गॅस कंपनीचे कर्मचारी किंवा सपोर्ट एक्झिक्युटिव्ह असल्याचे सांगून ग्राहकांकडून DAC किंवा OTP मागत असल्याचे समोर आले आहे.
गॅस कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की —
- कोणतीही गॅस कंपनी फोनवर OTP किंवा DAC विचारत नाही.
- सिलेंडर घरपोच आल्याशिवाय कोणालाही कोड देऊ नये.
- “सिलेंडर नाही, तर OTP नाही” हा नियम लक्षात ठेवावा.
फसवणुकीचा नवा प्रकार
सायबर गुन्हेगार ग्राहकांना —
- बुकिंग कन्फर्मेशन,
- KYC अपडेट,
- तातडीची डिलिव्हरी,
- सबसिडी बंद होणार,
अशा कारणांनी फोन करून OTP मागत आहेत. ग्राहकांनी निष्काळजीपणे कोड शेअर केल्यास आर्थिक फसवणूक होण्याचा धोका वाढत आहे.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
- अधिकृत गॅस एजन्सीकडून आलेला मेसेजच विश्वासार्ह मानावा.
- अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर माहिती देऊ नये.
- सिलेंडर डिलिव्हरी प्रत्यक्ष झाल्यानंतरच DAC सांगावा.
- संशयास्पद कॉल आल्यास तातडीने गॅस एजन्सीशी संपर्क साधावा.
देशात आधीच एलपीजी पुरवठ्याबाबत तणावपूर्ण परिस्थिती असताना आता सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत असल्याने ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Users Today : 10