नवी दिल्ली
एमव्ही होंडियस (MV Hondius) या क्रूझ जहाजावर हंता व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर जगभरात आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून भारतानेही खबरदारीचा उपाय म्हणून उच्चस्तरीय बायोसर्व्हिलान्स यंत्रणा सक्रिय केली आहे. या जहाजावरील दोन भारतीय क्रू सदस्य सध्या सुरक्षित असून त्यांच्यावर वैद्यकीय निरीक्षण ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमव्ही होंडियस या डच क्रूझ जहाजावर हंता व्हायरसची लागण झाल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जणांवर उपचार सुरू आहेत. जहाजावरील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विविध देशांतील नागरिकांचा समावेश आहे. दोन भारतीय नागरिकही जहाजाच्या क्रू सदस्यांमध्ये असल्याने भारत सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भारतीय नागरिक सध्या “निरोगी व लक्षणविरहित” आहेत. त्यांना आरोग्य सुरक्षेच्या नियमांनुसार नेदरलँड्समध्ये क्वारंटाईन करण्यात आले असून पुढील काही आठवडे त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, हंता व्हायरसच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद अर्थात Indian Council of Medical Research (ICMR) सतर्क झाली आहे. देशभरातील सुमारे १६५ प्रयोगशाळांना संशयित रुग्णांची तपासणी व निरीक्षणासाठी सक्रिय करण्यात आले आहे. तसेच विषाणूविषयक संशोधनालाही गती देण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, हंता व्हायरस प्रामुख्याने उंदरांच्या मल-मूत्राच्या संपर्कातून पसरतो. सामान्यतः हा विषाणू माणसाकडून माणसात पसरत नाही. मात्र, Andes strain हा प्रकार मर्यादित प्रमाणात मानवी संसर्ग पसरवू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटना अर्थात World Health Organization (WHO) ने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले असले तरी सध्या व्यापक महामारीचा धोका कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.
Users Today : 10