रील बनविण्याच्या नादात चार जणांचा तलावात बुडून मृत्यू

KHOZ MASTER
1 Min Read

रविवारी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या चार कोवळ्या जीवांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शिरपूरजवळील धातखेड तलावात घडली. रील बनविणे आणि पोहण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोलापुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील आठ ते नऊ मुले-मुली रविवारी, दि. १० मे रोजी शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील धातखेड तलाव परिसरात डबे पार्टीसाठी गेले होते. दुपारच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर काही युवक-युवती रील बनविण्यासाठी तसेच पोहण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरले.

यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एक मुलगा बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी गेलेली युवती तसेच इतर दोन मुलेही खोल पाण्यात ओढली गेली. काही क्षणांतच चौघेही पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच फरेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाठ हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून चौघांचे मृतदेह बाहेर काढले.

या दुर्घटनेत सोनाली नरेंद्र जोशी (वय १६), आदित्य नरेंद्र जोशी (वय १२), पायल बबलू पंडित (वय २१) आणि यश गजानन काकणे (वय १३) यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहणाऱ्या मातांच्या समोर मुलांचे मृतदेह आल्याने उपस्थितांचेही काळीज हेलावले. मातृदिनाच्या दिवशी शुभेच्छांऐवजी मुलांच्या निधनाची बातमी ऐकण्याचे दुर्दैव या मातांच्या वाट्याला आले.

0 9 7 0 7 4
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *