नव्याने बांधलेल्या विहिरीच्या कठड्यावर पाणी मारण्यासाठी बंद पडलेला विद्युत पंप सुरू करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्यासह त्याच्या दोन मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये बाजीराव सज्जेराव काकडे (वय ४९), श्याम बाजीराव काकडे (वय २२) आणि अजिनाथ बाजीराव काकडे (वय २६, सर्व रा. धानोरा, ता. सिल्लोड) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐन उन्हाळ्यात काकडे कुटुंबाच्या विहिरीला चांगले पाणी लागल्याने कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. नव्याने बांधलेल्या विहिरीच्या कठड्यांवर पाणी मारण्यासाठी दुरुस्त करण्यात आलेला विद्युत पंप सुरू करण्यासाठी बाप आणि दोन्ही मुले विहिरीत उतरली होती. मात्र अचानक विहिरीचा काही भाग ढासळल्याने तिघेही माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र मोठ्या प्रमाणात ढिगारा कोसळल्याने तिघांनाही वाचवता आले नाही. या दुर्दैवी घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्यात विहिरीला भरपूर पाणी लागल्यामुळे काकडे कुटुंब आनंदात होते. शेजारी आणि नातेवाईकांनीही समाधान व्यक्त केले होते; मात्र काही क्षणांतच काळाने घात केला आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Users Today : 8