हैदराबाद :
तेलुगू चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. उदयोन्मुख अभिनेता भारत कांत आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर त्रिलोक यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात हैदराबाद येथील आउटर रिंग रोडवरील बंगलोर गेटजवळ, एक्झिट क्रमांक १२ परिसरात घडला. भारत कांत आणि त्रिलोक हे नेल्लोरहून हैदराबादकडे कारने प्रवास करत होते. दरम्यान, भरधाव वेगाने मागून येणाऱ्या कंटेनर ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत भारत कांत आणि त्रिलोक यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या दुर्घटनेनंतर तेलुगू चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारत कांत हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख चेहरा मानला जात होता, तर त्रिलोक यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
दरम्यान, पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Users Today : 8