नागपुरात रेल्वेसमोर उडी घेऊन दोन तरुणांची आत्महत्या; परिसरात खळबळ

KHOZ MASTER
2 Min Read

नागपूर :

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उज्ज्वलनगर रेल्वे लाईनवर शनिवारी रात्री दोन तरुणांनी भरधाव रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी रात्री सुमारे ९.३५ वाजताच्या दरम्यान उज्ज्वलनगर परिसरातील रेल्वे डाउनलाईनवर दोन तरुण उभे असल्याचे दिसून आले. दरम्यान, भरधाव रेल्वे येत असताना दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले आणि रेल्वे जवळ येताच एकाच वेळी रेल्वेसमोर उडी घेतली.

अपघाताचे स्वरूप अत्यंत भीषण होते. रेल्वेची जोरदार धडक बसल्यानंतर दोघांच्याही शरीराचे तुकडे रेल्वे रुळांजवळ विखुरले गेले. रेल्वे ट्रॅकमॅन जगदीश शिवपाल कामडी यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान दोन्ही तरुणांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.

एका अंदाजे २५ ते ३० वर्षीय तरुणाचे डोके, हात-पाय आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते, तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह पूर्णपणे विद्रूप अवस्थेत आढळला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिहान येथील एम्स रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल चामोले यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृतांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जर तुम्हाला किंवा तुमच्या परिचयातील कोणाला भावनिक तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असतील, तर तातडीने कुटुंबीय, मित्र किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. मदत उपलब्ध आहे.

0 9 7 0 7 4
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *