मुंबई
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत न्याय न मिळाल्यास आपले सर्व शासकीय पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या २६ वर्षांपासून सुरू असलेल्या जमीन वाद प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने लागूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील धनकवडी परिसरातील त्यांच्या मालकीच्या जमिनीबाबत दीर्घकाळ न्यायालयीन संघर्ष सुरू आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही संबंधित आदेशांची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचा दावा उषा चव्हाण यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी पुणे महानगरपालिकेवर गंभीर आरोप करत, न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करून एका खासगी बिल्डरला फायदा करून देण्यात आल्याचे म्हटले. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
“ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेला न्याय दिला, त्या राज्यात आज कलाकारांनाच स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.
तसेच, न्याय मिळाला नाही तर आपले सर्व पुरस्कार आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी अर्पण करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, एका ज्येष्ठ कलाकाराला न्यायासाठी अशी लढाई द्यावी लागत असल्याने विविध स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
Users Today : 32