फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरच्या बुलेटचा धुमाकूळ; अल्पवयीनांकडून अंधाधुंद वेगाने वाहनचालना, कारवाईची मागणी…

KHOZ MASTER
2 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा

मंठा शहरा सह तालुक्यात कर्कश आवाज करणाऱ्या बदललेल्या सायलेन्सरच्या बुलेट दुचाकींमुळे नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः अल्पवयीन मुलांकडून ही वाहने अंधाधुंद आणि अमर्यादित वेगाने चालवली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्ता तसेच स्वामी शाळा रोड परिसरात या वाहनांचा मोठ्या आवाजात होणारा सुसाट प्रवास नागरिकांच्या शांततेवर परिणाम करत आहे.
काही वाहनधारकांनी कंपनीचे मूळ सायलेन्सर काढून त्याऐवजी फटाक्यांसारखा आवाज करणारे सायलेन्सर बसवले आहेत. त्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, भरधाव वेगामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून यापूर्वी काही दुर्घटना घडल्याचेही बोलले जात आहे.
विशेष बाब म्हणजे, काही वाहनांवर नंबर प्लेट नसणे, फॅन्सी नंबर टाकणे किंवा कोऱ्या नंबर प्लेटचा वापर करणे असे प्रकारही सर्रास दिसून येत आहेत. त्यातच अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवली जात असल्याने पालकांच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांनी शहरातील बेकायदेशीर प्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था राखण्यात पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी या बुलेटस्वारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी अशाच प्रकारावर पोलीस प्रशासनाने संबंधित दुचाकी जप्त करून, वाहनधारकांच्या खर्चाने मूळ सायलेन्सर बसवून घेत दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे काही काळ हा प्रकार थांबला होता. मात्र, पुन्हा सुरू झालेल्या या धिंगाण्यामुळे नागरिकांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शहरातील शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरच्या बुलेटवर तातडीने कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

0 9 7 1 3 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *