गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
परतूर/मंठा, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचवावे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने परतूर–मंठा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रभावी नियोजन आणि प्रशासनाशी सुसंवादातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागली आहेत. घरकुल, शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, रोजगार, शिक्षण, औद्योगिक विकास, महसूल सेवा आणि ग्रामीण पायाभूत सुविधा या सर्वच क्षेत्रांत शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून हजारो कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश आले आहे.
मंठा तालुक्यात गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त तसेच सर्वसामान्य कुटुंबांना कायमस्वरूपी निवारा मिळावा यासाठी विविध घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून पंचायत समिती मंठा अंतर्गत आतापर्यंत एकूण २१ हजार ३३७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे १५ हजार ५४७, रमाई आवास योजनेचे ४ हजार ०५, शबरी आवास योजनेचे २५३, मोदी आवास योजनेचे ३१७, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे ७७२ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेचे ४४३ लाभार्थी समाविष्ट आहेत. घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पीएम सूर्यघर योजनेंतर्गत सौर ऊर्जा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून मोफत वाळू योजनेअंतर्गत ९० लाभार्थ्यांना ४५० ब्रास वाळूचे वाटप करण्यात आले आहे.
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि शेती अधिक सक्षम व्हावी यासाठी विविध कृषी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत २७ हजार शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून दरवर्षी प्रत्येकी ₹६ हजार, तर नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २७ हजार शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून अतिरिक्त ₹६ हजार सन्माननिधी थेट खात्यात जमा केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी ₹१२ हजारांचा थेट आर्थिक लाभ मिळत आहे. याशिवाय नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजना आणि पंतप्रधान पीक विमा योजना यांमुळे नैसर्गिक संकटातही शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळत आहे.
ग्रामीण भागात रोजगार निर्मितीबरोबरच शेतीपूरक सुविधा निर्माण करण्यासाठी नरेगा विभागामार्फत एकूण ७१७ विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये ३३३ सिंचन विहिरी, ११ शेततळे, ३५२ गोठे आणि २१ वृक्ष लागवड प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळाली आहे.
आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारी पोहोचविण्यासाठी आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री आरोग्य सहायता योजना आणि गोल्डन कार्ड योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजनेतून दरमहा ₹१५००, तर लेक लाडकी योजनेतून मुलींसाठी एकूण ₹१.०१ लाखांपर्यंत लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अटल पेन्शन योजना यांद्वारे ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग आणि गरजू घटकांना आर्थिक आधार मिळत आहे.
शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीनेही मतदारसंघात मोठी झेप घेतली जात आहे. मानव विकास योजनेअंतर्गत ११ बसेसद्वारे २ हजार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून गुणवत्ता आराखड्यात परतूर तालुक्याने जिल्ह्यात दुसरे स्थान मिळविले आहे. परतूर आणि मंठा येथे एमआयडीसी प्रकल्पांना गती मिळाल्याने स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. तसेच बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत ४८० किलोमीटर रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होत आहे.
शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी, जयपूर, तळणी, ढोकसाळ, माळतोंडी आणि मंठा ग्रामीण या मंडळांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान – समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. महसूल, आरोग्य, मतदार नोंदणी, शिधापत्रिका, आधार दुरुस्ती, भूमी अभिलेख, गोल्डन कार्ड, कृषी आणि विविध शासकीय योजनांद्वारे या मंडळांमध्ये एकूण १३ हजार २०३ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या समाधान शिबिरांदरम्यान कृषी विभागामार्फत आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी १२० ट्रॅक्टर, ९ औजारे बँक, ७ पावर टिलर, १० मळणी यंत्र, २५ रोटावेटर, २० पेरणी यंत्र, २ पाचट कुट्टी यंत्र आणि ५ हार्वेस्टर अशा एकूण १९८ शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा लाभ देण्यात आला. त्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला मोठी चालना मिळत आहे.
तसेच नगर पंचायत, मंठा मार्फत शहरी भागातील नागरिकांसाठी विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून एकूण ४ हजार ४१३ लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ हजार १११ लाभार्थी, पीएम स्वनिधी योजनेंतर्गत ७७७ लाभार्थी (₹१० हजार, ₹२० हजार आणि ₹५० हजार कर्ज सुविधा), पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत ३५७ लाभार्थी, रमाई आवास योजनेंतर्गत २८० लाभार्थी, ५ टक्के दिव्यांग निधी अंतर्गत ११५ लाभार्थी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सेवेतून ६५३ लाभार्थी, तर नियमित शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण प्रकरणांमध्ये १२० नागरिकांची कामे मार्गी लावण्यात आली.
परतूर तालुक्यात ‘महाराजस्व’ अभियानाचा जागर; समाधान शिबिरातून ७,९१७ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ
महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियान – समाधान शिबिर’ उपक्रमांतर्गत परतूर तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये जन कल्याणाचा यज्ञ पार पडला. आष्टी, सृष्टी, वाटूर, सातवाना खुर्द, परतूर ग्रामीण, परतूर शहर आणि कोकाटे हादगाव या महसूल मंडळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांच्या माध्यमातून प्रशासनाने थेट जनतेच्या दारात जाऊन विविध योजनांचा लाभ पोहोचवला. या विशेष मोहिमेत एकूण *७,९१७ लाभार्थ्यांना* विविध योजनांचे लाभ प्रदान करण्यात आले असून, यामुळे तालुक्यातील गरजू कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अभियानात सर्वाधिक भर हा घरकुल योजनांवर देण्यात आला. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या ५,४३७ लाभार्थ्यांसह रमाई आवास योजना (८६३), अहिल्यादेवी होळकर आवास योजना (१,२२३) आणि मोदी आवास योजनेच्या १,२७६ लाभार्थ्यांचा समावेश आहे. निराधार घटकांसाठी आधारवड ठरलेल्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ ८९४ लाभार्थ्यांना देण्यात आला. तसेच, कृषी क्षेत्राला बळ देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून १२५ शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ मिळाला, ज्यामुळे भविष्यात या भागातील बागायती क्षेत्राला गती मिळणार आहे.
परतूर शहरात ‘समाधान’ शिबिरात सरकारी योजनांचा धडाका; ३८०६ हून अधिक लाभार्थ्यांना मिळाला प्रत्यक्ष लाभ
परतूर येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’त विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या शिबिरात रमाई आवास योजनेच्या ११९९ मंजूर घरकुलांपैकी १२१ लाभार्थ्यांना ६०.१८ लक्ष रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले, तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY-1) ७५०७ लाभार्थ्यांना थेट लाभ दिला गेला. याचवेळी PMAY-2 मधील ४४४१ मंजूर अर्जांपैकी १५० जणांना तातडीने बांधकाम परवाने सुपूर्द करण्यात आले. आर्थिक सक्षमीकरणासाठी पीएम स्वनिधी योजनेतून १८६७ जणांचे आणि पीएम विश्वकर्मा योजनेतून ४७९ कारागिरांचे कर्ज मंजूर करून त्यांचे वितरण करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी नवीन शववाहिनीचे लोकार्पण करण्यात आले असून, २०२७ च्या जनगणनेच्या अनुषंगाने स्वयं-प्रगणन जनजागृतीवरही या शिबिरात विशेष भर देण्यात आला.
शिक्षण आणि बालविकास क्षेत्रातील योजनांचीही या शिबिरात प्रभावी अंमलबजावणी झाली. शिक्षण विभागामार्फत ६९० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला, तर ‘राईट टू एज्युकेशन’ (RTE) अंतर्गत १८३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली. यासोबतच, एकात्मिक बालविकास योजनेतून ४९ लाभार्थ्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळाला. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामांसाठी आवश्यक असलेली ३५ उत्पन्न प्रमाणपत्रे आणि ५ रहिवासी प्रमाणपत्रे जागेवरच वितरित करण्यात आली. प्रशासनाच्या या लोकाभिमुख भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांपासून मुक्ती मिळाली असून, ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने परतूर तालुक्यात यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी आमदार बबनराव लोणीकर म्हणाले, “शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या तरच विकासाला खरी दिशा मिळते. मंठा तालुक्यातील प्रत्येक कुटुंब आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा आमचा संकल्प असून शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही अखंड सुरू राहतील.” परतूर–मंठा मतदारसंघात लोकाभिमुख निर्णय, प्रभावी नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचत असून विकासाचा नवा आदर्श निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड तहसीलदार दामोदर जाधव तहसीलदार सुमन मोरे उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे मंठा नगरपंचायत चे मुख्य अधिकारी सुरज बिस्कुटे शत्रुघ्न कणसे संपत टकले नगराध्यक्ष वंदनाताई वैजनाथ बोराडे उपनगराध्यक्ष छायाताई अरुण वाघमारे कैलास बोराडे राजेश मोरे यमुनाताई शेषनारायण दवणे, वैजनाथ बोराडे अरुण वाघमारे विकास सूर्यवंशी प्रसादराव बोराडे राजेश खंदारे उमेद बागवान मुस्तफा पठाण शेषनारायण दवने शेख रहीम पाशाभाई तांबोळी समंदर पठाण नागेश ढवळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
Users Today : 14