नाशिक
बहुचर्चित म्हाडा जमीन फसवणूक प्रकरणात नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक Kalpesh Abaji Patil यांना नाशिक शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर महापालिकेतील अधिकारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांकडून महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात वारंवार भेटी दिल्या जात आहेत. त्यामुळे चौकशीच्या भीतीने अनेक अधिकारी महापालिकेत न थांबता गायब होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
म्हाडा प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, या पथकाचे नेतृत्व विभागीय आयुक्त Pravin Gedam करत आहेत. पाच सदस्यीय या पथकाकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या ४९ भूखंड वाटपांमध्ये बेकायदेशीर व्यवहार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी तब्बल १९८ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सोन मनवाणी, दीपक करमचंदानी, नायब तहसीलदार नितीन पाटील, नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील तसेच भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक Bipin Chandrakant Kajale यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून यापूर्वी नगररचना विभागात कार्यरत राहिलेल्या अधिकाऱ्यांची माहिती संकलित केली जात असून, काही विद्यमान अधिकारीही तपासाच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी काही बांधकाम व्यावसायिक व विकसकांना अभय दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले असून, अनेक अधिकारी कारवाईच्या भीतीने कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून अनेक प्रशासकीय कामे रखडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
दोघांना वाढीव दोन दिवसांची पोलीस कोठडी
म्हाडा जमीन फसवणूक प्रकरणात न्यायालयाने सोमवारी (दि. ११) Kalpesh Abaji Patil आणि Bipin Chandrakant Kajale यांना वाढीव दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोलिसांनी दोघांना ६ मे रोजी रात्री अटक केली होती असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Users Today : 25