पंतप्रधान Narendra Modi यांनी आपल्या सुरक्षा ताफ्यात कपात करण्याचा निर्णय घेत संसाधन संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश दिल्याची चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात होत आहे. जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक संसाधनांचा संयमित वापर आणि काटकसरीवर भर देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वशैलीबाबत बोलताना अनेकांनी त्यांच्या कृतीतून संदेश देण्याच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. ज्या गोष्टींचे आवाहन ते देशवासीयांना करतात, त्याची अंमलबजावणी स्वतःपासून करण्याची त्यांची पद्धत ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब मानली जाते.
सुरक्षा ताफ्यात कपात करण्याच्या निर्णयामुळे इंधन बचत, संसाधनांचे संवर्धन आणि सार्वजनिक पैशांचा जबाबदारीने वापर याबाबत सकारात्मक संदेश गेला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेला अनुसरून घेतलेले हे पाऊल देशाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि दूरदृष्टी अधोरेखित करणारे असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.
दरम्यान, या निर्णयाकडे केवळ प्रतीकात्मक उपक्रम म्हणून नव्हे, तर प्रशासनात काटकसर आणि जबाबदारीची भावना दृढ करण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
