कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराने मृत्यू सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे हृदयद्रावक घटना

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा :

मुलीच्या लग्नासाठी अनेक दिवसांपासून धावपळ करणाऱ्या पित्याचा कन्यादानाचा विधी सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे घडली. कुरूमदास कुंडलिक भुतेकर (वय ५०) असे मृत वधूपित्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरूमदास भुतेकर यांची कन्या नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आर्डा (तोलाजी) येथील प्रदीप महादेव नानोटे यांच्यासोबत मंगळवारी पार पडत होता. मुलीचा विवाह आनंदात आणि संस्मरणीय व्हावा यासाठी भुतेकर गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाच्या तयारीत व्यस्त होते.

लग्नसोहळ्यात सकाळपासून आनंदाचे वातावरण होते. मंगलाष्टकांचे स्वर, पाहुण्यांची गर्दी आणि वऱ्हाडी मंडळींची लगबग यामुळे संपूर्ण परिसर उत्साहात न्हाऊन निघाला होता. दुपारपर्यंत विवाह विधी सुरळीत पार पडले. सायंकाळी पाठवणीपूर्वी कन्यादानाचा भावनिक विधी सुरू असताना कुरूमदास भुतेकर आपल्या मुलीचा हात वराच्या हाती देत होते. त्याचवेळी अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि काही क्षणांतच ते मंडपात कोसळले.

उपस्थितांनी तातडीने त्यांना सिंदखेड राजा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे काही क्षणांपूर्वी आनंदात असलेले लग्नघर अचानक शोकमग्न झाले.

कुरूमदास भुतेकर यांना यापूर्वीही हृदयविकाराचा त्रास होता. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच काळात त्यांच्या आईचेही निधन झाले होते. कौटुंबिक संकटांवर मात करत त्यांनी काही दिवसांपूर्वी मुलाचा विवाह उरकला होता आणि मुलीचाही विवाह मोठ्या उत्साहात पार पाडण्याचा निर्धार केला होता.

या घटनेमुळे वर्दडी बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत असून बुधवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

0 9 7 1 9 7
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *