शेगाव
शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात दारू पिण्यासाठी पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार, १३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन राजू तायडे (वय ४०, रा. धनगर नगर, शेगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी शेख जावेद शेख करीम (वय ३०, रा. काँग्रेस नगर, शेगाव) याचा मृत शाहरुख हारून पटेल (वय ३१, रा. शेगाव) याच्यासोबत दारू पिण्यासाठी पैशांच्या कारणावरून वाद झाला होता.
आठवडी बाजारातील बजरंगबली मंदिराजवळ दोघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपीने शाहरुख पटेल यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात शाहरुख गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुरुवार, १४ मे रोजी सकाळी ११:१० वाजता शेगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.
Users Today : 25