रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन

KHOZ MASTER
1 Min Read

 मेहकर प्रतिनिधी :
तालुक्यातील लोणीगवळी-घाटबोरी रस्त्याचे रखडलेले आणि अर्धवट अवस्थेतील काम अखेर ग्रामस्थांच्या संतापाचा विषय ठरले असून, शनिवारी घाटबोरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले रस्त्याचे काम मागील चार महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

अमडापूर-लोणीगवळी-घाटबोरी-विश्वी-बेलगाव या महत्त्वाच्या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पलायन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खडीचे ढिगारे, खोदकाम आणि अपूर्ण पृष्ठभाग पडून असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अंकुश श्रीराम राठोड, राजू तुकाराम कुसळकर, शंकर श्यामराव गिरी, सुभाष मिरे यांच्यासह ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर निष्क्रियतेचा आरोप करत तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा मेहकर हायवे मार्गावर रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अंकुश राठोड आणि राजू कुसळकर यांनी दिला.

ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, रखडलेल्या कामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *