बुलढाणा
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम आणि निरोगी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील तब्बल ८७० ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग नोंदवून आरोग्यदायी गाव उभारण्याचा संकल्प केला आहे.
या अभियानांतर्गत गावपातळीवर स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, लसीकरण, माता-बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध, कुपोषण निर्मूलन, तंबाखूमुक्त परिसर, नियमित आरोग्य तपासणी तसेच विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत पदाधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागामुळे अभियानाला अधिक गती मिळाली आहे. गावांमध्ये स्वच्छता मोहीम, आरोग्यविषयक स्पर्धा, रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिरे, पोषण जनजागृती, शाळांमधील आरोग्य शिक्षण तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रमही मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येत आहेत.
‘निरोगी गाव – समृद्ध गाव’ हा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या अभियानातून सुरू असून, आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढताना दिसत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित गावांनीही या अभियानात सहभागी होऊन आरोग्यदायी आणि स्वच्छ गाव उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
