‘प्रत्येक बूथवर बीएलए नेमणुका पूर्ण करा’; प्रतापराव जाधव यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा 
‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवित प्रत्येक बूथवर बीएलए नेमणुका तातडीने पूर्ण कराव्यात, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

एसआयआर अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या शिंदेसेना बीएलए नेमणूक अभियानांतर्गत शनिवारी बुलढाणा शहरातील वारकरी भवन येथे युवासेना आणि महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी बीएलए-२ संदर्भातील विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना नामदार जाधव बोलत होते.

या प्रशिक्षण शिबिराला आमदार संजय गायकवाड, बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार तसेच पश्चिम विदर्भ समन्वयक संजय अगलदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जनतेचा मोठा पाठिंबा पक्षाला मिळत असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बूथस्तरावर प्रभावी नियोजन आणि संघटनबांधणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले की, स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती आखून पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक बूथवर सक्षम बीएलए नेमणूक ही आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मार्गदर्शन करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “शिवसैनिक हा संघटनेचा खरा आत्मा आहे. येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या बळावर लढायच्या असून, त्या जिंकण्यासाठी प्रत्येक बूथवर नेमणुका करून संघटन अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.”

या प्रशिक्षण शिबिरातून बूथस्तरावरील संघटनबांधणीसह आगामी निवडणुकांच्या तयारीला वेग देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *