कोल्हापूर
अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील एका सासऱ्याने आपल्या परदेशात राहणाऱ्या जावयासाठी तब्बल दीड किलो वजनाच्या चांदीच्या कोल्हापुरी चपला बनवून घेत अनोखी भेट दिली आहे. सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीच्या या खास चपलांची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.
हिंदू परंपरेनुसार अधिक मासात जावयाला विशेष भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. याच परंपरेला आधुनिक आणि राजेशाही स्पर्श देत कोल्हापुरातील एका कुटुंबाने चक्क चांदीच्या कोल्हापुरी चपला तयार करून घेतल्या.
या अनोख्या चपला तयार करण्याचे काम कारागीर Vikrant Mali यांनी केले. त्यांनी प्रथम पारंपरिक लेदरची कोल्हापुरी चप्पल विकत घेत तिच्या डिझाइननुसार चांदीचे सर्व भाग तयार केले. जवळपास आठ दिवस मेहनत घेऊन ही कलाकृती साकारण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा जावई परदेशात वास्तव्यास असून, “परदेशात असतानाही त्याला कोल्हापूर आणि मराठी संस्कृतीची आठवण राहावी” हा या भेटीमागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, अधिक मासानिमित्त इतर काही हौशी सासऱ्यांनीही आपल्या जावयांसाठी चांदीचे दागिने आणि आकर्षक वस्तू तयार करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सोन्या-चांदीच्या वाढत्या किमती आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात काटकसरीचे आवाहन होत असताना कोल्हापुरातील या हटके भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पारंपरिक कोल्हापुरी चप्पल आणि चांदीचा संगम असलेल्या या अनोख्या भेटीमुळे “कोल्हापूरकरांचा नादच खुळा” ही म्हण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Users Today : 9