होम ट्युशन ते १०० कोटींचं साम्राज्य; NEET पेपरफुटी प्रकरणात RCC संचालक शिवराज मोटेगावकर CBIच्या रडारवर

KHOZ MASTER
3 Min Read

लातूर :

देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET UG पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली असून, या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लातूर, पुणे आणि नांदेड येथे मोठी कारवाई करत लातूरमधील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC) चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांची कसून चौकशी केली आहे. चौकशीनंतर RCC पॅटर्न आणि गेस पेपरमधील प्रश्नांवरून संशय अधिक गडद झाला आहे.

CBIच्या अधिकाऱ्यांनी लातूरमध्ये तळ ठोकून मोटेगावकर यांची तब्बल ८ ते १० तास चौकशी केली. या चौकशीत RCC च्या गेस पेपरमधील तब्बल ४२ प्रश्न NEET परीक्षेत जसेच्या तसे आल्याचे समोर आल्याने तपास यंत्रणांनी गंभीर दखल घेतली आहे. डिजिटल डेटा, आर्थिक व्यवहार आणि प्रश्नपत्रिकेच्या गळतीशी संबंधित नेटवर्कचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संघर्षातून उभं राहिलेलं साम्राज्य

शिवराज मोटेगावकर यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी शिक्षण सुरू ठेवत नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम.एस्सी. (केमिस्ट्री) पदवी पूर्ण केली. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला होम ट्युशन घेतली होती.

यानंतर उमरगा आणि लातूरमधील महाविद्यालयांत केमिस्ट्री प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी ‘रेणुकाई करिअर सेंटर’ची स्थापना केली. केमिस्ट्री विषयापुरती मर्यादित असलेली ही शिकवणी पुढे मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांच्या मोठ्या कोचिंग नेटवर्कमध्ये परिवर्तित झाली. “सर्व विषय एकाच छताखाली” या संकल्पनेमुळे RCC ने अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली.

‘RCC पॅटर्न’ चर्चेत

RCC कडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या नोट्स, टेस्ट सिरीज आणि गेस पेपरची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जात होती. “आमच्या गेस पेपरमधील प्रश्न थेट परीक्षेत येतात,” असा दावा संस्थेकडून वारंवार केला जात होता. मात्र, आता हाच दावा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

कोरोना काळात RCC ने ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून पुणे, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत आपले जाळे विस्तारले. सध्या या डिजिटल नेटवर्कचा वापर प्रश्नपत्रिका गळतीसाठी झाला का, याचाही तपास सुरू आहे.

तपास यंत्रणांची नजर

CBI कडून RCC शी संबंधित संगणकीय माहिती, मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहार आणि परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या साहित्याची तपासणी सुरू आहे. या प्रकरणामुळे खासगी कोचिंग संस्थांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, अधिकृत निष्कर्ष आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच अंतिम सत्य स्पष्ट होणार आहे.

0 9 7 2 8 4
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *