सिंदखेड राजा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी ही केवळ भौगोलिक ओळख नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याची आणि आंबेडकरी चळवळीतील ऐतिहासिक संघर्षभूमी म्हणून ओळखली जाते. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाशी या भूमीचा थेट संबंध असल्याने या ठिकाणाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
नागपूर ते औरंगाबाद लाँग मार्चदरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीत राहेरी परिसरात घडलेल्या घटनांनी चळवळीच्या इतिहासात खोल ठसा उमटवला. या पार्श्वभूमीवर राहेरी ही जागा “लाँगमार्च संघर्षभूमी” म्हणून ओळखली जाऊ लागली.
या शहीदांच्या स्मृती जतन व्हाव्यात, स्मारक उभे राहावे आणि भावी पिढ्यांना या संघर्षाचा इतिहास समजावा यासाठी गवई कुटुंबीयांनी सुमारे दोन एकर जमीन दान दिली होती. मात्र इतक्या महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळाकडे अपेक्षित लक्ष न दिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
दरवर्षी विविध कार्यक्रमांमध्ये काही नेते व पदाधिकारी येथे अभिवादनासाठी येतात, मात्र प्रत्यक्ष स्थळ विकासाच्या दृष्टीने ठोस कामकाज झाले नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ना भव्य शहीद स्तंभ उभारण्यात आला, ना परिसराचे सुशोभीकरण, ना स्मारक विकासासाठी कायमस्वरूपी योजना राबविण्यात आली.
दरम्यान, पूर्णा नदीकाठावरील या परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतुकीचे प्रकार वाढल्याचेही गंभीर चित्र समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही वाळू माफियांकडून या भागात खुलेआम रेती उपसा केला जात असून ट्रॅक्टर व हायवा वाहनांद्वारे वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. यामुळे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नसून, ऐतिहासिक संघर्षभूमीच्या पावित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहीदांच्या स्मृतींचे संवर्धन न होता उलट त्याच भूमीचा अवैध धंद्यांसाठी वापर होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक स्तरावर स्मारक विकास, संरक्षक भिंत, सुशोभीकरण आणि अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संघर्षभूमीचा सन्मान हा केवळ अभिवादनापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष संरक्षण व विकासातून दिसावा, अशी भावना स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
