वाशिम
,(जिमाका) जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून, पेट्रोल पंपांवर गर्दी न करण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या आणि पेट्रोल पंप धारकांच्या सतत संपर्कात आहे. पेट्रोल पंपांवर इंधनाचे वाटप सुरळीत व्हावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
एकाच दिवसात पावणेआठ लाख लिटर इंधन दाखल
जिल्ह्यात आज (दि. १९ मे) विविध ऑईल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात इंधनाचा पुरवठा झाला आहे. यामध्ये:
IOCL कडून ५६ हजार लिटर पेट्रोल आणि २ लाख २ हजार लिटर डिझेल.
BPCL कडून ४५ हजार लिटर पेट्रोल आणि २ लाख ३० हजार लिटर डिझेल.
HPCL कडून ६६ हजार लिटर पेट्रोल आणि १ लाख ७५ हजार लिटर डिझेल.
जिल्ह्यात आज एकाच दिवसात एकूण १ लाख ६७ हजार लिटर पेट्रोल आणि ६ लाख ७ हजार लिटर डिझेलचा साठा प्राप्त झाला आहे. तसेच दररोज असाच इंधनसाठा जिल्ह्याला प्राप्त होणार आहे.
अतिरिक्त खरेदी टाळा; प्रशासनाचे आवाहन
कंपन्यांकडून दररोज याच पद्धतीने इंधनाचा पुरवठा होणार असल्याचे पुरवठा शाखेने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, केवळ आवश्यकतेनुसारच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे. पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये ,प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Users Today : 21