चाइल्ड हेल्पलाईनला यश; महिनाभरात २४ बालविवाह रोखले **नागरिकांना १०९८ वर माहिती देण्याचे आवाहन

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा 

महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत चाइल्ड हेल्पलाईन १०९८ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलढाणा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून मागील एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल २४ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. बालविवाह प्रतिबंधासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घेत विविध यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.

चाइल्ड हेल्पलाईन १०९८ कडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करत संभाव्य बालविवाह रोखण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

### विविध यंत्रणांचा समन्वय

चाइल्ड हेल्पलाईनच्या पथकात प्रकल्प समन्वयक शेख, समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, केस वर्कर प्रवीण गवई, मुकेश मोरे आणि राहुल सुरडकर यांनी गावपातळीवर ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी आणि पोलिस यंत्रणेशी समन्वय साधून ही कारवाई केली.

तक्रार मिळताच पथक घटनास्थळी पोहोचून पोलिस हेल्पलाईन ११२, संबंधित पोलिस स्टेशन आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विवाह थांबवण्यात आले. त्यानंतर संबंधित बालिकांना पुढील चौकशीसाठी बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.

बालकल्याण समितीने प्रकरणांची चौकशी करून बालिकांचे समुपदेशन केले. काही प्रकरणांमध्ये बालिकांना शासकीय बालिका गृह, बुलढाणा येथे पाठविण्यात आले.

### तालुकानिहाय रोखलेले बालविवाह

चिखली – ५, देऊळगाव राजा – ४, सिंदखेड राजा – ४, लोणार – ३, मेहकर – २, मोताळा – २, बुलढाणा – २, मलकापूर – १, खामगाव – १ असे एकूण २४ बालविवाह रोखण्यात आले.

### प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे.

समुपदेशक शारदा पवार आणि विद्या खरे यांनी बालिकांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *