मेहकर वनपरिक्षेत्रात धडक कारवाई अवैध वृक्षतोडीचा मोठा साठा जप्त; मुख्य वनसंरक्षक अमरावती व उपवनसंरक्षक बुलढाणा यांच्या आदेशाने मोहीम

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर,
बुलढाणा जिल्ह्यातील अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने मेहकर वनपरिक्षेत्रात मोठी धडक कारवाई करत सुमारे १०० घनमीटर अवैध लाकूड साठा जप्त केला आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती तसेच उपवनसंरक्षक बुलढाणा यांच्या विशेष सूचनांनुसार ही मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईत अवैध लाकूड ट्रकांमध्ये चढवून ठेवलेले असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाने तात्काळ साठा जप्त केला असून पुढील तपास सुरू केला आहे. सहाय्यक वनसंरक्षक मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आर. सातपुते यांच्या नेतृत्वात मेहकर, लोणार आणि सुलतानपूर परिसरात संयुक्त तपास मोहीम राबविण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून लाकडाची साठवणूक केल्याचे उघडकीस आणले.

तपासादरम्यान वेगवेगळ्या भागात ठेवलेले लाकूड जप्त करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने तपास अधिक तीव्र केला आहे.

वन विभागाने स्पष्ट इशारा देत अवैध वृक्षतोड, वाहतूक किंवा साठवणुकीत सहभागी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे व संशयास्पद हालचालींची माहिती वन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *