रायपूर
बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील भारत गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत संबंधित एजन्सीवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेनेचे चिखली उपशहर प्रमुख राहुल वरवंडे यांनी १८ मे रोजी जिल्हाधिकारी तसेच बुलढाणा तहसीलदार यांना निवेदन सादर करून ही मागणी केली.
निवेदनानुसार, रायपूर येथील भारत गॅस एजन्सीकडून सुमारे ९५० रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर तब्बल २ हजार रुपयांना विकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच चिखली येथील सैलानी नगर परिसरात गॅस सिलेंडरचा अवैध साठा ठेवण्यात येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सैलानी नगर परिसरातून अतिरिक्त पैसे घेऊन नागरिकांना गॅस सिलेंडर पुरविले जात असल्याचा आरोप करत, ऑटो व कारमध्ये असुरक्षित पद्धतीने गॅस भरून दिला जात असल्याची गंभीर बाबही समोर आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भविष्यात यामुळे गॅस स्फोटासारखी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकडून ५०० ते १००० रुपये अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याचा आरोपही करण्यात आला असून, या योजनेचा गैरवापर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित भारत गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर राहुल वरवंडे यांच्यासह महेंद्र जाधव, पुंजाजी शेळके, समाधान जाधव, अक्षय, शेख अफसर शेख, दीपक जाधव, संतोषराव देशमुख, प्रल्हाद वाघ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
