सोशल मीडियावर सध्या “कॉक्रोच जनता पार्टी”ची जोरदार चर्चा सुरू असून, या मोहिमेमुळे अभिजित दीपके हे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. बेरोजगारी, तरुणांचे प्रश्न आणि व्यवस्थेवर उपरोधिक शैलीत भाष्य करणाऱ्या मिम्समुळे त्यांच्या या सोशल मीडिया कॅम्पेनला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अवघ्या पाच दिवसांत अभिजित दीपके यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 10.8 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे. तरुण वर्गामध्ये या मोहिमेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, अनेक जण त्यांच्या पोस्ट्स शेअर करत आहेत.
अभिजित दीपके हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असले तरी ते मूळचे हिंगोली जिल्ह्यातील आहेत. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथे त्यांचे वडिलोपार्जित घर असून, तिथे त्यांचे काका आणि इतर कुटुंबीय राहतात. गावातील त्यांचे मोठे, बैठं घर आणि अंगणातील झाडांनी नटलेले वातावरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गावकऱ्यांमध्येही अभिजित आणि त्यांच्या पार्टीबाबत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
अभिजित दीपके यांनी पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून, नुकतीच त्यांनी अमेरिकेतील Boston University मधून पब्लिक रिलेशन्स विषयात मास्टर ऑफ सायन्स पदवी पूर्ण केली आहे. सोशल मीडियावर ते यापूर्वीपासून सक्रिय असून विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर भूमिका मांडत आले आहेत.
2020 ते 2022 या काळात त्यांनी Aam Aadmi Party च्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम केले होते. तसेच 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या डिजिटल कॅम्पेन आणि रणनीती टीममध्येही त्यांनी सहभाग घेतल्याचे सांगितले जाते.
अभिजित यांच्या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी अभिमान व्यक्त केला आहे. “लहानपणापासून काहीतरी मोठं करण्याची त्याची इच्छा होती,” असे त्यांच्या काकांनी सांगितले. तर काकूंनीही “तो लहानपणापासून धीट होता,” असे म्हणत त्याच्या कामाचे कौतुक केले आहे.
दरम्यान, “धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी” हे घोषवाक्य असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची पुढील वाटचाल काय असेल, याकडे आता देशभरातील तरुणांचे लक्ष लागले आहे.
