मेहकर शहरात इंधन तुटवड्यावर उद्धवसेना आक्रमक ## शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

KHOZ MASTER
2 Min Read

मेहकर

राज्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वाहनधारक आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा अपुरा असल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

## शेतीकामांवर थेट परिणाम

सध्या शेती मशागती आणि पेरणीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पंप आणि शेतीमाल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता आहे. मात्र इंधन उपलब्ध नसल्याने शेतीकामे खोळंबली असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे निवेदनात नमूद आहे.

## साठेबाजीवर कारवाईची मागणी

काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून साठेबाजी आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, तसेच ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर विशेष नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतीकामांसाठी आवश्यक इंधनाला प्राधान्य देण्याची मागणीही उद्धवसेनेने केली आहे. ही मागणी आमदार Siddharth Kharat यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या निवेदनावेळी उद्धवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक नितीन तुपे, प्रा. सतीश ताजने, अमर घोडे, महेश रिंढे, युवा सेना तालुकाप्रमुख अॅड. आकाश घोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *