बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश पाटील अवचार यांची निवड

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा 

अखेर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश पाटील अवचार यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. तब्बल ५० वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष घाटाखालील भागातून निवडला गेल्याने या निर्णयाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

या नियुक्तीमुळे मावळते जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची अध्यक्षपदाची कारकीर्द संपुष्टात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सृजन अभियाना’अंतर्गत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष बदलांना मंजुरी दिली होती.

त्याच प्रक्रियेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवचार यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पक्ष निरीक्षकांच्या आढावा बैठका, अंतर्गत चाचपणी आणि स्थानिक संघटनात्मक समीकरणांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

प्रकाश अवचार हे कलाशाखेचे पदवीधर असून शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. १९९१ मध्ये युवक काँग्रेसच्या ग्रामशाखा अध्यक्षपदापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर विविध सहकारी संस्थांमध्ये संचालक म्हणून काम करत त्यांनी संघटनात्मक अनुभव मिळवला. २००७ ते २००९ या काळात त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *